पांडुरंग महोत्सवानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न..
जिल्हा प्रतिनिधी शिवाजी दवणे
बोल महाराष्ट्र न्यूज 9730170965
ताहाराबाद, ता. राहुरी : श्री पांडुरंग महोत्सव व गोपाळकाला उत्सवानिमित्त ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर, पुणे संचलित नेत्र तपासणी केंद्र, राहुरी, दिव्यांग शक्ती सेवा संस्था, राहुरी आणि प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन महंत ह. भ. प. अर्जुनजी महाराज तनपुरे (मठाधिपती, श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान, ताहाराबाद) तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र साबळे होते.
पांडुरंग महोत्सवानिमित्त देवदर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लेन्ससहित पूर्णपणे मोफत एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर, पुणे येथे करण्यात येणार आहे. यासाठी रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड व पासपोर्ट साईज फोटो जमा करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी प्रास्ताविकातून, “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे सांगितले.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. संकेत घोलप यांनी उपस्थितांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, नेत्रविकार टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी तसेच रुग्णालयामार्फत उपलब्ध असलेल्या विविध सेवांची सविस्तर माहिती दिली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसोबतच आवश्यक लेन्सही शंभर टक्के मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आणि सहकार्य हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, रुग्णसेवक गौरव तनपुरे, संस्थेचे सचिव बाळासाहेब मुसमाडे यांच्यासह श्री पांडुरंग महोत्सव यात्रा कमिटीचे सदस्य व प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रहार संघटनेचे शाखाध्यक्ष कैलास हारदे, तालुकाध्यक्ष योगेश लबडे, तालुका सचिव रवींद्र भुजाडी, तालुका उपाध्यक्ष विजय म्हसे, तालुका खजिनदार नानासाहेब खपके, सिद्धार्थ नेहे, बाळासाहेब गांडाळ, पाराजी भोसले तसेच प्रहार सैनिक व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.










