गणरायाच्या चरणी सायबर सुरक्षेचा संदेश, कसबा गणपती येथे विशेष सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन
पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाच्या सहकार्याने पुण्याचे मानाचे पहिले गणपती कसबा गणपती येथे विशेष सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून प्रत्येक व्यक्तीला सायबर सुरक्षित करणे, हा या व्यापक जनजागृती उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी नागरिक व भाविकांशी संवाद साधत विविध खेळ, प्रश्नमंजुषा आणि संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश दिला. ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, संशयास्पद दुवे, सामाजिक माध्यमांची सुरक्षितता आणि डिजिटल व्यवहारांमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमाला कार्याध्यक्ष निलेश वकील, स्वागताध्यक्ष मंदार देशपांडे, उपकार्याध्यक्ष सुरज गाढवे तसेच कसबा गणपती सामाजिक संस्थेचे विश्वस्त श्री. अनिल पानसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सायबर जनजागृतीच्या कार्याचे कौतुक केले.या उपक्रमासाठी संस्थेच्या प्राचार्य डॉ. अनघा वैद्य, विभागप्रमुख रुपाली सराफ आणि शिक्षक समन्वयक मनाली सपकाळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल व्यवहारांचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.










