१४ सायबर सुरक्षा सत्रांतून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जागृती
पुणे प्रतिनिधी-
पुणे : विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी क्विक हील फाउंडेशनच्या ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थी हर्षा भांडे आणि सोनम शेख यांनी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाद्वारे आतापर्यंत १४ शाळांमध्ये सायबर सुरक्षा सत्रे घेण्यात आली असून इयत्ता ५वी ते ज्युनियर कॉलेज पर्यंतच्या २८०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यात आला आहे. सत्रांमध्ये फिशिंग, बनावट लिंक व वेबसाइट्स, OTP व पासवर्डची सुरक्षितता, सोशल मीडिया सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल फुटप्रिंट, सायबर बुलिंग, डीपफेक आणि ऑनलाइन गेमिंगमधील धोके यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी प्रश्नोत्तर, संवादात्मक उपक्रम आणि विविध खेळांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या सत्रातून विद्यार्थ्यांना सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्यासाठी प्रेरित करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या डॉ. अनघा वैद्य,
एच.ओ.डी रुपाली सराफ व प्रा. मनाली सपकाळ यांचे सहकार्य लाभले.










