📰 बोल महाराष्ट्र न्यूज | अकलूज प्रतिनिधी
श्री गणेश विद्यालय, पिंपळनेरला सन २०२६-२७ चा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदानअकलूज (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्या., बाळे (सोलापूर) यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळांना प्रदान करण्यात येणारा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ (सन २०२६-२७) यंदा शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर (ता. माढा) या शाळेला प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार शाळेचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समर्पित कार्य, शाळेचे स्वच्छ व प्रशस्त परिसर, क्रीडा मैदान, विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकाल तसेच समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याच्या कार्याचा सखोल विचार करून देण्यात आला.पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यानंतर हा मानाचा पुरस्कार विद्यालयात आणल्यानंतर शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे, ज्येष्ठ संचालक गुरुदेव पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यालयाला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी शाळेच्या यशामागील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. हा पुरस्कार संपूर्ण पिंपळनेर परिसरासाठी अभिमानाची बाब असून, भविष्यातही शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार विद्यालयाने व्यक्त केला.श्री गणेश विद्यालयाने मिळविलेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल परिसरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.📸 छायाचित्रे :1. सोलापूर येथे आदर्श शाळा पुरस्कार स्वीकारताना विद्यालयाचे प्रतिनिधी.2. सन २०२६-२७ च्या आदर्श शाळा पुरस्काराची मानचिन्ह व प्रशस्ती.3. श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करतानाचे क्षण.











