मुरा देवी गावात कारभाराचा बोजवारा : नाल्यांचे घाण पाणी, बंद स्ट्रीट लाईट आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याने ग्रामस्थ त्रस्त
अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी
ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे गावात रोगराईचा धोका, वरिष्ठांकडून कारवाईची मागणीअंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुरा देवी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सततधार पाऊस पडत असल्याने शासनाने अनेक ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांचा कार्यकाल संपला आहे. गावाची संपूर्ण जबाबदारी, नियोजन, विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामसेवक यांच्याकडे प्रशासक सरपंच म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु मुरा गावचे ग्रामसेवक अनंत बहादुरे यांचे नागरिकांच्या समस्या आणि गावाच्या विकासाकडे अजिबात लक्ष नाही. ग्रामसेवक रुजू झाल्यापासून ते वेळेवर ग्रामपंचायतीतही येत नाहीत.पावसाळा सुरू झाला आहे. गावच्या मुख्य रस्त्यावर नालीचे सांडपाणी वाहत आहे. त्याच पाण्यातून नागरिकांना, शाळेच्या मुलांना आणि अंगणवाडीतील लहान मुलांना ये-जा करावी लागत आहे. गावातील नाल्या कचऱ्याने पूर्णपणे तुंबल्या आहेत.गेल्या 4-5 दिवसांपासून गावातील स्ट्रीट लाईटही बंद आहेत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे सापांपासून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या UPSC, MPSC च्या क्लासेससाठी जाणाऱ्या मुला-मुलींना या रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. संध्याकाळी उशिरा बस मिळाल्याने उशीर होतो. अशा वेळी जर कोणत्याही मुलीला काही दुखापत झाली तर त्याला जबाबदार प्रशासक आणि गावचे ग्रामसेवक बहादुरे राहतील. मुख्य रस्त्यावर गावातील कचऱ्याचे ढीग लागले आहेत. अनेक ठिकाणी बंगाली काटेरी झुडपे वाढली आहेत.यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे आणि गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या रोगराईमुळे जवळच्या औरंगपूर येथे 3 लोकांचा बळी गेला आहे.जर काही जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता ग्रामस्थांसमोर आहे.ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागणी केली आहे की गावच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गावाची पाहणी करावी आणि हलगर्जी ग्रामसेवकावर योग्य ती कारवाई करावी.










