डिजिटल व्यवहारात सतर्कतेचा संदेश; आठवलेज्, साईनगर येथे सायबर जनजागृती
पुणे प्रतिनिधी-
पुणे : वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहावे, यासाठी आठवलेज्, साईनगर, हिंगणे येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत Quick Heal Foundation यांच्या उद्देशाने आयोजित या सत्रामध्ये उपस्थितांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, फिशिंग, बनावट लिंक, OTP व UPI फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता आणि विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.दैनंदिन जीवनात घडणाऱ्या ऑनलाइन फसवणुकींची उदाहरणे देत अनोळखी फोन, संदेश किंवा लिंकवर विश्वास ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच OTP, UPI PIN, पासवर्ड आणि इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, संशयास्पद लिंक ओळखावी आणि सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी, याबाबतही माहिती देण्यात आली.हा उपक्रम महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थिनी नित्या भंगाळे आणि जिया सहानी यांनी राबविला. Quick Heal Foundation आणि महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या सहयोगातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश समाजातील विविध घटकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी सक्षम करणे हा आहे.या उपक्रमासाठी संस्थेच्या प्राचार्या डॉ. अनघा वैद्य, शिक्षक समन्वयक प्रा. मनाली सपकाळ आणि विभागप्रमुख रुपाली सराफ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच आठवलेज्, साईनगर, हिंगणे येथील उत्सव नेने यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे हा जनजागृती उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.










