पत्रकार- मच्छिंद्र करे
बारामती शहर पोलिसांच्या पहाटेच्या सापळ्याला यश
पोलीस हवालदार उदय टापरे यांची धडाकेबाज कामगिरी; न्यायालयीन वॉरंट बजावणीत पुन्हा एकदा अचूक नियोजनाचा प्रत्यय* बारामती शहर पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करत सन २०१४ पासून सुमारे १२ वर्षे न्यायालयीन पकड वॉरंट प्रलंबित असलेल्या सागर लक्ष्मण जाधव, रा. कसबा, बारामती यास पहाटेच्या नियोजनबद्ध कारवाईत ताब्यात घेऊन मा. न्यायालयासमोर हजर केले आहे.सदर इसमाविरुद्ध Negotiable Instruments Act, 1881 चे कलम 138 अन्वये चेक अनादराचे प्रकरण मा. न्यायालयात प्रलंबित असून, त्यास न्यायालयासमोर हजर करण्यासाठी Non-Bailable Warrant (NBW) जारी करण्यात आले होते. दीर्घ कालावधीपासून संबंधित इसम मिळून येत नसल्याने वॉरंटची बजावणी प्रलंबित होती.बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. उदय टापरे यांनी सदर वॉरंटची बजावणी करण्याचे आव्हान स्वीकारून संबंधित इसमाच्या हालचाली व वास्तव्याबाबत गोपनीय माहिती संकलित केली. आरोपी पहाटेच्या वेळी घरी मिळण्याची शक्यता असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नियोजनपूर्वक त्याच्या घराजवळ सापळा रचला.आज सकाळी संबंधित इसम घरी मिळून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस हवालदार उदय टापरे यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयीन पकड वॉरंटाची कायदेशीररीत्या बजावणी करून त्यास मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले.मा. न्यायालयाने प्रकरणातील वस्तुस्थिती व प्रलंबित न्यायालयीन कार्यवाही विचारात घेऊन आवश्यक आदेश पारित केले असून, मा. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित इसमाची येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.“वॉरंट जुने असो अथवा नवीन, न्यायालयीन आदेशाची बजावणी होणारच”पोलीस हवालदार श्री. उदय टापरे हे न्यायालयीन वॉरंटावरील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेषतः पहाटेच्या वेळेत गोपनीय माहितीच्या आधारे घराजवळ अथवा संभाव्य ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्यासाठी ओळखले जातात. दीर्घकाळ मिळून न येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्या हालचालींची खातरजमा करणे आणि योग्य वेळ साधून कोणताही अनुचित प्रकार घडू न देता त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करणे, ही त्यांची कार्यपद्धती ठरली आहे.तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्यायालयीन पकड वॉरंटाची बजावणी करून संबंधित इसमास न्यायालयासमोर उभे करण्याची ही कामगिरी त्यांच्या चिकाटीची, कर्तव्यनिष्ठेची आणि न्यायालयीन आदेशांप्रती असलेल्या जबाबदारीची साक्ष देणारी आहे.बारामती शहर पोलिसांनी या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, न्यायालयीन वॉरंट काढल्यानंतर ठिकाण बदलून किंवा दीर्घकाळ पोलिसांना मिळून न आल्याने न्यायालयीन प्रक्रियेपासून कायम दूर राहता येणार नाही. प्रलंबित वॉरंटांची काटेकोरपणे बजावणी करून संबंधित व्यक्तींना न्यायालयासमोर हजर करण्याची मोहीम यापुढेही तितक्याच प्रभावीपणे सुरू राहणार आहे.पोलीस हवालदार श्री. उदय टापरे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या न्यायालयीन वॉरंट बजावणीच्या कामकाजाला आणखी धार मिळाली असून, त्यांच्या अचूक नियोजनाचे, सातत्याचे व कर्तव्यतत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.*“पहाटेचा सापळा, अचूक माहिती आणि थेट न्यायालयात हजेरी” — बारामती शहर पोलिसांची १२ वर्षांपासून प्रलंबित वॉरंटावर निर्णायक कारवाई* बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण










