पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती
पुणे : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे, यासाठी पुणे नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. Quickheal Foundation यांच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना सुरक्षित ऑनलाइन व्यवहार, फिशिंग, बनावट लिंक, OTP व UPI फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता आणि विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्रामध्ये दैनंदिन जीवनात घडणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांची विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. अनोळखी व्यक्तीकडून येणारे फोन, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देताना कोणती काळजी घ्यावी, संशयास्पद लिंक किंवा वेबसाइट ओळखण्याच्या पद्धती, तसेच OTP, UPI पिन, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता योग्य वेळी योग्य ती पावले उचलणे आणि संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदविणे याबाबतही माहिती देण्यात आली.
हा उपक्रम महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थिनी मयुरी पोस्ते आणि वैदेही शर्मा यांनी राबविला. हा प्रकल्प Quick Heal Foundation आणि महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्यातील सहयोगातून सायबर सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. सायबर शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमासाठी संस्थेच्या प्राचार्या डॉ. अनघा वैद्य, शिक्षक समन्वयक प्रा. मनाली सपकाळ आणि विभागप्रमुख रुपाली सराफ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच पुना नाईट हायस्कूलचे प्राचार्य सतीश वाघमारे आणि हायस्कूल प्रशासनानेही या उपक्रमासाठी सहकार्य केले.










