पाथरोट (अचलपूर): प्रतिनिधी इम्रान सौदागर
स्थानिक पाथरोट गावातील वॉर्ड क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या पार्डी रोडवर गेल्या दोन दिवसांपासून मुख्य जलवाहिनी फुटल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे जलवाहिनी फुटल्यामुळे दररोज हजारो लिटर पिण्याचे शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे, तर दुसरीकडे येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
पिण्याच्या पाण्यात मिसळतेय नाल्यातील घाण आणि चिखल
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ही जलवाहिनी अगदी मुख्य नाल्याजवळ फुटली आहे. यामुळे रस्त्यावरील साचलेली घाण, नाल्यातील काळा चिखल आणि दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट मुख्य जलवाहिनीमध्ये ओढले जात आहे. हेच दूषित आणि विषारी पाणी आता नागरिकांच्या घराघरांतील नळांमध्ये पोहोचत असून नळातून चिखलमय पाणी येत आहे.
लहान मुले व वृद्ध आजारी; गावात साथीच्या रोगाची भीती
वॉर्ड क्रमांक ४ मधील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याचा दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. या नाईलाजामुळे नागरिक हेच गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी गाळून पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरत आहेत. या दूषित पाण्याच्या सेवनामुळे गेल्या २४ तासांत अनेक लहान मुले आणि वृद्धांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर संपूर्ण पार्डी रोड परिसरात मोठी जलजन्य साथ पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.











